Narhari Zirwal : ‘फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने’; विरोधकांकडून झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी
Narhari Zirwal : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडत आंदोलन केले.

Narhari Zirwal : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यादरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईचे पडसाद आज विधानभवनात उमटले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाविरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी विरोधकांकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी ‘फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने’, ‘मंत्रालयात एकच हिरवळ, यांचं नाव झिरवळ झिरवळ’, ‘भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवळ राजीनामा द्या’, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली. ‘राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत जर मंत्र्यांच्या डोळ्यादेखत लाच घेतली जात असेल, तर हे सरकार भ्रष्टाचारात किती बुडाले आहे हे स्पष्ट होते. मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय खालचा कर्मचारी एवढे धाडस करू शकत नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून नरहरी झिरवाळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,’ अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराची घटना समोर आली. एका प्रलंबित फाईलच्या मंजुरीसाठी एका लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले. मंत्र्यांच्या दालनापर्यंत भ्रष्टाचाराचे धागेदोरे पोहोचल्याने विरोधकांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. Narhari Zirwal :
हेही वाचा :






