Priyanka Chopra: रक्ताने माखलेला चेहरा, हातात बंदूक; हॉलीवूड चित्रपट ‘द ब्लफ’मधील प्रियंका चोप्राचा दमदार लूक समोर

Priyanka Chopra: बॉलिवूडनंतर आता हॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘द ब्लफ’ मधील पहिला लूक समोर आला असून, यात प्रियंका एका धाडसी समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रियंकाने शेअर केले फोटो
प्रियंका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘द ब्लफ’मधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे वेगवेगळे अंदाज पाहायला मिळतात. एका फोटोमध्ये ती तलवार हातात घेऊन संतापात लढताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती रक्ताने माखलेली, हातात बंदूक पकडून उभी आहे. काही चित्रांमध्ये ती कुटुंबासोबत जेवणाच्या टेबलावर बसलेली दिसते, तर काही ठिकाणी रक्षक आणि समुद्री डाकू अशा दोन्ही रूपांत नजर येते. या फोटोंना कॅप्शन देताना प्रियंकाने लिहिले आहे, “आई, रक्षक आणि समुद्री डाकू… भेटा ब्लडी मेरीला.”
‘ब्लडी मेरी’च्या भूमिकेत प्रियंका
या चित्रपटात प्रियंका एर्सेल बॉडेन उर्फ ‘ब्लडी मेरी’ ही भूमिका साकारत आहे. ब्लडी मेरी ही एक कुख्यात माजी महिला समुद्री डाकू आहे, जिला आपला हिंसक भूतकाळ मागे टाकायचा आहे. मात्र, जुने शत्रू आणि पूर्वीचे साथीदार परत आल्यामुळे तिला पुन्हा संघर्षाला सामोरे जावे लागते. या भूमिकेसाठी प्रियंकाने प्रत्यक्ष आयुष्यातील महिला समुद्री डाकूंविषयी सखोल अभ्यास केल्याचेही सांगितले जाते.
View this post on Instagram
निक जोनसने केले कौतुक
प्रियंकाचा पती आणि गायक निक जोनस यानेही तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. त्याने हा लूक आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले, “पूर्ण जग पाहील, या चित्रपटात प्रियंका किती जबरदस्त आणि प्रभावी दिसते.”
कधी आणि कुठे होणार रिलीज?
रुसो ब्रदर्स निर्मित आणि फ्रँक ई. फ्लावर्स दिग्दर्शित ‘द ब्लफ’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रियंकासोबत कार्ल अर्बन प्रमुख भूमिकेत आहे. तसेच टेमुएरा मॉरिसन, इस्माईल क्रूझ कॉर्डोवा, सफिया ओकले-ग्रीन, जॅक मॉरिस यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.
समुद्री डाकूच्या भूमिकेत प्रियंकाचा हा हटके आणि दमदार अवतार प्रेक्षकांना किती भावतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





