पाकिस्तानी आगळिकी थांबेनात; बीएसएफ अधिकाऱ्याला वीरमरण

जम्मू – मागील महिन्यात सातत्याने शस्त्रसंधी भंग करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनी नव्या महिन्याच्या प्रारंभीही आगळिकी कायम ठेवल्या. त्यांनी मंगळवारी भारतीय हद्दीत केलेल्या माऱ्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका अधिकाऱ्याला वीरमरण आले.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा भडीमार केला. त्याचे लक्ष्य भारतीय सीमा नाके ठरले. पाकिस्तानी माऱ्यात बीएसएफचा अधिकारी शहीद झाला. त्या माऱ्याला बीएसएफच्या जवानांनी तडाखेबंद प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत असणाऱ्या भारतीय हद्दीतही मारा केला. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी अनेकदा शस्त्रसंधी भंग केला. त्या घटनांमध्ये महिनाभरात 15 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्यये शहीद झालेल्या 9 सुरक्षा जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
चालू वर्षात पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे अक्षरश: थैमान घातले. तशाप्रकारच्या 4 हजार 100 हून अधिक घटनांची नोंद 11 महिन्यांत झाली. दशकभरातील ते प्रमाण सर्वांधिक ठरले आहे. पाकिस्तानी माऱ्याला भारतीय सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. त्यामध्ये पाकिस्तानची मोठी हानी होत असल्याचे समजते.





