Jammu Kashmir: उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय लष्कराने गुरुवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. जम्मू-काश्मीर पोलिसांना नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान, दहशतवाद्यांची हालचाल दिसल्याने सैनिकांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला प्रत्युत्तर देताना लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे गुरेज सेक्टरमध्ये संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सतर्क सैनिकांनी संशयास्पद हालचाल पाहिली, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सैनिकांनी प्रभावी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. ही कारवाई अद्याप सुरू आहे.