BRT Route – शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्गांवर सध्या खासगी वाहनांचा वाढता शिरकाव ही गंभीर समस्या बनली आहे. जलद, सुरक्षित आणि वेळेत प्रवासी वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बीआरटी व्यवस्थेचा मूळ उद्देशच या बेशिस्त वाहनचालकांमुळे धोक्यात आला आहे. याचा थेट फटका प्रवाशांच्या सुरक्षिततेला तसेच पीएमपीएमएलच्या बसचालकांना बसत आहे.निगडी, आकुर्डी, चिंचवड, फुगेवाडी, कासारवाडी, वाकड, रावेत, पिंपळे सौदागर तसेच भोसरी परिसरातील बीआरटी मार्गांवर दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाचालक मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. बीआरटी मार्ग हा केवळ पीएमपीएमएल बससाठी राखीव असतानाही अनेक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेश नाही असे स्पष्ट सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र हे फलक वाहनचालकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असून, वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.विशेषतः रावेत बीआरटी मार्गावर खासगी वाहनांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. बीआरटी खासगी वाहने या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करतात. मात्र अचानक समोर येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांमुळे बसचालकांना वारंवार आपत्कालीन ब्रेक लावावे लागत आहेत. परिणामी, बसमधील प्रवाशांना जोरदार धक्के बसत असून, वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बस चालवतानाचा अनुभव सांगताना, बीआरटी मार्गात अचानक खासगी वाहन समोर आले की बस तात्काळ थांबवावी लागते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेग कमी करणे आवश्यक असते, पण अचानक ब्रेक लागल्याने प्रवाशांना धक्के बसतात. काही वेळा प्रवाशांकडून नाराजीही व्यक्त केली जाते. रावेतसारख्या भागात ही समस्या रोजची झाली आहे. नियमांची कडक अंमलबजावणी झाली तरच अपघात टाळता येतील, असे एका बसचालकाने सांगितले.दरम्यान, बीआरटी मार्गांवर वाहतूक पोलिस आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तपणे कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई वाढवावी, वारंवार नियम मोडणाऱ्यांचे परवाने निलंबित करावेत, तसेच रावेतसह सर्व बीआरटी लेनची भौतिक अडथळ्यांद्वारे स्पष्ट विभागणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अपघाताचा धोका अधिक सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होते. बीआरटी मार्गात अचानक घुसणाऱ्या खासगी वाहनांमुळे अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो. अनेकवेळा किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्या असून, सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची भीती प्रवासी आणि बसचालकांकडून व्यक्त केली जात आहे.