“भाऊ तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं…’ बच्चू कडूंना पुन्हा घेरलं

नाशिक – काही दिवसांपूर्वीच प्रहारचे आमदार ‘बच्चू कडू’ हे धाराशिव येथे कोर्टाच्या तारखेसाठी आले होते. यादरम्यान कोर्टातील काम संपवून ते निघत असताना. काही शेतकऱ्यांनी त्यांना घेरलं. यापैकी 80 वर्षीय शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडू यांना आपण गद्दारी का केली..?, असा जाब विचारला.
मात्र, यावेळी बच्चू कडू काही न बोलता गाडीत बसून निघून गेले. यादरम्यानचा त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या.
दरम्यान, आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार नाशिक मध्ये घडल्याचं दिसून आलं आहे. काल आमदार बच्चू कडू न्यायालयीन कामासंदर्भात नाशिक येथे आले होते. त्यानंतर त्यांनी नाशिक मधील ग्रामीण भागात दौरा केला. यावेळी बच्चू कडू हे निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गेले होते.
यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली असता, “भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत या गद्दारांबरोबर जायला नको होतं…”, असं म्हणत एका शेतकऱ्याने बच्चू कडू यांना थांबवलं. मात्र, यावेळी सुद्धा काही न बोलताच बच्चू कडू यांनी वेळ मारुन नेली. आणि तेथून काढता पाय घेतल्याचं दिसून आलं.





