ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; म्हणाले…

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हिंदू देशबांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक असलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी याच प्रमाणे करोनावर विजय मिळवण्याचे संकेतही दिले आहेत.
जसे भगवान रामांने रावणाला हरवले तसेच आपण करोनावरही मात करू, असा विश्वासही त्यांनी दिला. येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी आव्हाने आपल्यासमोर उभी राहतील. परंतु आपण एकजुटीने करोनाचा सामना करू असेही ते म्हणाले. जागतिक पातळीवर व्हर्च्युअल माध्यमातून दिवाळीचा आनंद साजरा करणाऱ्या एका कार्यक्रमाचे बोरिस जॉन्सन यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उद्धाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
ज्याप्रकारे भगवान श्रीराम आणि त्यांच्या पत्नी सीता हे रावणावर विजय मिळवून आपल्या धरी परतले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे उजळले होते. त्याचप्रकारे आपण आपला मार्ग शोधू शकतो आणि विजय मिळवू शकतो. यावर्षी दीपावलीचा सण ब्रिटनमध्ये करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यानच साजरा केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.





