UK : प्रिगोझिन यांना पुतीन यांनीच मारले असावे – बोरीस जॉन्सन

लंडन :- रशियातील वॅगनर ग्रुप या भाडोत्री सैन्यदलाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांची हत्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनीच घडवून आणली असावी, असा दाट संशय ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.
प्रिगोझिन यांच्या अखेरच्या काळातील घडामोडींच्या आधारे जॉन्सन यांनी एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी आपला संशय व्यक्त केला आहे. प्रिगोझिन आणि त्यांचे साथीदार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानाच्या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ते विमान जाणीवपूर्वक पाडण्यात आले असावे, असा संशय अमेरिका आणि पाश्चात्य गुप्तचरांनी व्यक्त केला आहे. त्याचा संदर्भ जॉन्सन यांनी दिला आहे.
प्रिगोझिन प्रवास करत असलेले एम्ब्रायर लीगसी 600 हे विमान विश्वासार्ह मानले जाते. ते सरळ जमिनीवर कोसळले, तेंव्हा नक्की काय होते आहे, याची प्रिगोझिन यांनाही नक्की कल्पना आली असावी. तब्बल 28 हजार फुटांवर झालेल्या या अपघातामागे कोणाचा हात आहे, याचीही त्यांना कल्पना आली असावी.
ज्या व्यक्तीने अलेक्झांडर लिटविनेन्को आणि सर्जी स्क्रीपाल यांच्यावर विषप्रयोग केला, त्याच व्यक्तीने प्रिगोझिन यांच्या विमानाचा अपघातही घडवून आणला असल्याचा संशय जॉन्सन यांनी व्यक्त केला.
पुतीन यांच्याशी युक्रेनमधील शांततेच्या संदर्भाने कोणतीही चर्चा केली जाऊ शकत नसल्याचेही जॉन्सन यांनी म्हटले आहे.




