शेअर बाजारात हॅपी दिवाळी! गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे सुसाट… सेन्सेक्स 411 अंकांनी वाढून 84,363 वर

मुंबई – देशातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी दिवाळीत खरेदी करण्याची मोहीम चालूच ठेवली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गेल्या आठवड्यापासून खरेदी करीत आहेत. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात भरघोस वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 411 अंकांनी वाढून 84,363 अंकावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 133 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी वाढून 25,843 अंकावर बंद झाला. ब्ल चीप कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी नफादायक ताळेबंद जाहीर केला. अशा परिस्थितीत या कंपनीच्या शेअरचा भाव 3.52 टक्क्यानी वाढला. या कंपनीच्या रिटेल आणि दूरसंचार विभागाने चांगली कामगिरी केले आहे.
बजाज फिन्सर्व, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, टीसीएस, टायटन, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आयसीआयसीआय बँक, महिंद्रा, इंटरनल, अदानी स्पोर्ट्स, पॉवरग्रेड या कंपन्यांनी मात्र मार खाल्ला.
दक्षिण कोरिया, जपान येथील निर्देशांक वाढले होते. सकाळी युरोपियन शेअर बाजारातही खरेदीचे वातावरण होते. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार निर्देशांक वाढले. अमेरिकेतील काही बँकांची अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र एकूणच बँकिंग व्यवसायावर याचा जास्त परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण आल्यानंतर अमेरिकेत खरेदी वाढली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 308 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली. शुक्रवारी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,526 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
त्यामुळे दिवाळीत शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर राहण्यास मदत होत आहे. मंगळवारी शेअर बाजारात मुहूर्ताचे व्यवहार सायंकाळी होणार आहेत. ते सकारात्मक असतील आशी अपेक्षा ब्रोकर्सकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1.75 टक्क्यांनी म्हणजे 1,451अंकानी वाढला. निफ्टी सरलेल्या आठवड्यात 1.67 टक्क्यानी म्हणजे 424 अंकांनी वाढला.




