ब्रिटन पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात ;भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

नवी दिल्ली : जगात कोरोनाच्या लसीकरणाच्या हालचालींना वेग आलेला असतानाच ब्रिटनमध्ये निरिक्षणादरम्यान कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार उघड झाला आहे. सध्याच्या घडीला ब्रिटनमध्ये कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर असण्यास कोरोनाचा हा नवा प्रकारच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीची बैठकही बोलवल्याचे म्हटले जात आहे.सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आपात्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या नव्या प्रजातीविषयी चर्चा होणार आहे.
ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीची टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ब्रिटनमधील कोरोनाच्या या नव्या प्रकाराची माहिती मिळताच यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवेतील डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडेल. भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिन हेसुद्धा या बैठकीत सहभागी होण्याचा अंदाज आहे’.





