Vinesh Phogat Reaction : “व्यवस्था आणि सरकारने त्यांना वाचवले…”; न्यायालयाच्या निर्णयानंतर विनेश फोगाटचा थेट आरोप, लढा सुरूच ठेवणार!
Brij Bhushan Acquitted : या धक्कादायक निकालानंतर स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Vinesh Phogat Reaction on Brij Bhushan Sharan Singh Acquitted : भारतीय क्रीडा आणि राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी बृजभूषण सिंह आणि महासंघाचे माजी सहसचिव विनोद तोमर यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करता आले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या धक्कादायक निकालानंतर स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण?
जानेवारी २०२३ मध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे बृजभूषण यांच्याविरोधात दीर्घकाळ आंदोलन केले होते. बृजभूषण सिंह यांनी अल्पवयीन व महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आणि धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून १५ जून २०२३ रोजी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात अनेक महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात साक्ष दिली होती, मात्र अखेर कोर्टाने पुराव्याअभावी बृजभूषण यांना दोषमुक्त केले.
#WATCH | Delhi | People congratualted Brij Bhushan Sharan singh with floral garlands and bouquets after he was acquitted by Rouse Avenue Court in the women wrestlers alleged sexual harassment case. pic.twitter.com/0NRhj99ASh
— ANI (@ANI) August 3, 2026
“आम्ही आशा सोडलेली नाही!” – विनेश फोगाट
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 3, 2026
या निकालानंतर विनेश फोगाटने सोशल मीडियावर आपली संतप्त आणि भावूक प्रतिक्रिया दिली. विनेश म्हणाली, “एका प्रभावशाली नेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. सत्ता आणि प्रभावाच्या जोरावर बृजभूषण यांनी अनेक मुलींवर दबाव टाकून तक्रारी मागे घेण्यास भाग पाडले. तरीही अनेक महिला कुस्तीपटू ठामपणे उभ्या राहिल्या. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले नाही याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा आणि सरकार बृजभूषण यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.”
पुढील पाऊल स्पष्ट करताना विनेशने सांगितले की, महिला कुस्तीपटूंनी या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याचे निर्देश वकिलांना दिले असून, ते लवकरच केले जाईल. “आम्ही आशा सोडलेली नाही, आमचा हा लढा पुढेही सुरूच राहील,” असा ठाम निर्धार तिने व्यक्त केला.





