कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जामिनावर मुक्त असलेल्या दोन लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला आहे. लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून लाचखोर कर्मचाऱ्यांना राजाश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्र्यांना द्यायचा होता का? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी फडणवीस यांचा सत्कार तलाठ्यांनी केला. याबाबत वैभव नाईक यांनी अनेक सवाल उपस्थित केले. नेमकं काय म्हणाले वैभव नाईक? वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करणे गरजेचे होते, अथवा महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला पाहिजे होता. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जामिनावर मुक्त असलेल्या दोन लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला आहे, असं वैभव नाईक म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून लाचखोर कर्मचाऱ्यांना राजाश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्र्यांना द्यायचा होता का? कोणाच्या वरदहस्तामुळे या लाचखोर कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची संधी देण्यात आली? बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लाचखोर कमचारी सापडत आहेत. या लाचखोर कर्मचाऱ्यांचा नेमका आका कोण? असा सवालही या सत्काराच्यानिमित्ताने उपस्थित होत असून देवेंद्र फडणवीस यांचे लाचखोर कमचाऱ्यांना अभय आहे का? असे अनेक सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना शाल घालून सत्कार करणारे वायंगणीचे तलाठी विठ्ठल कंठाळे यांनी २२ मार्च २०२२ मध्ये वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यवसायिकांकडून २५ हजारांची लाच मागितली होती. तर खरेदी खताची सातबारावर नोंद मंजूर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये कसालचे मंडळ अधिकारी संदीप हांगे यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक केले होते. त्यानंतर तलाठी विठ्ठल कंठाळे व मंडळ अधिकारी संदीप हांगे यांना निलंबित करण्यात आले. आता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या दोन्ही तलाठ्यांची अवैध वसुली संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली चौकशी थांबविण्यासाठीच तलाठ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. असा आरोप नाईक यांनी केला आहे.