Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

उत्तराखंड – चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ धाम मंदिराचे कवाडं (दरवाजे) हिमवृष्टीमुळे बंद करण्यात आली आहेत. केदारनाथ मंदिर आणि गंगोत्री मंदिराची कवाडं देखील याआधीच बंद केली गेली आहेत. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा अनुक्रमे चार ठिकाणांचा चारधाम यात समावेश होतो. हिवाळ्यात अतिशय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हिमवृष्टीमुळे चारधाम यात्रेत येणाऱ्या या मुख्य मंदिरांची कवाडं बंद केली जातात. जी लवकरच पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
यावर्षी होणाऱ्या चारधाम यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या नरेंद्र नगरमध्ये बसंत पंचमीनिमित्त आयोजित सभेत नुकतीच ही घोषणा करण्यात आली. सध्या बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित 3 धाम येत्या काही दिवसांत जाहीर होतील. जोशीमठ येथील भूस्खलन प्रकरणाचा चारधाम यात्रेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावेळी सांगितले. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी सरकार आपल्या वतीने सर्व व्यवस्था करणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
नरेंद्र नगरच्या राणी राजलक्ष्मी, बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय आणि राजपुरोहित आचार्य कृष्णप्रसाद उनियाल यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत गुरुवारी बसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यासोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली. नक्षत्रांची गणना केल्यानंतर, पुजाऱ्यांनी 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.10 वाजता दरवाजे उघडण्याची घोषणा केली.
अजेंद्र अजय म्हणाले की, दरवाजे उघडण्यापूर्वी 12 एप्रिल 2023 रोजी गडू घडा तेल कलश यात्रा काढण्यात येईल. या प्रवासाच्या 15 दिवसांनंतर, बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील. यासह, यावर्षीची चारधाम यात्रा सुरू होईल. केदारनाथ धाम, यमुनोत्री धाम आणि गंगोत्री धामचे दरवाजे उघडण्याची तारीख देखील लवकरच निश्चित केली जाईल’. असं ते यावेळी म्हणाले.





