BREAKING NEWS : काँग्रेस फुटणार? देवेंद्र फडणवीस यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले? वाचा…

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून, या आठवड्यात आज (3 ऑगस्ट) अखेर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांनी वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं.
वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत दिल्याचं दिसून आलं. यावेळी बोलताना फडणवीसांनी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. 2019 मंत्रीपदासाठी, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटेंचं नाव चर्चेत होतं.
तीनही वेळा काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना हुलकावणी मिळाल्याने, वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावा दरम्यान बोलताना, “आता संग्राम भाऊंच कायं होणार, त्यांचं असं नेहमी का होत?’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपास्थित केला. फडणवीस पुढे म्हणाले की,
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडलं त्यावेळी आम्ही शेवटपर्यंत ऐकत हेातो की, विधानसभेचे अध्यक्ष संग्राम थोपटे होणार, संग्राम यांचे नाव येणार. संग्रामभाऊंची चिठ्ठी झालीय, चिठ्ठी निघालीय, चिठ्ठीवर सही झालीय, पण त्यांच्या नावाची चिठ्ठी डिस्पॅच होता होता कुठे अडते, हे कळत नाही..’ असा टोला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला.





