Manoj Jarange : एकजुटीने तुटून पडा ! मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

Manoj Jarange – आता विधानसभा निवडणूक झाली. डोक्यातून निवडणूक काढून टाका. आता लेकरांच्या भविष्यासाठी आरक्षणाचा विचार करा. तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आरक्षण हवे आहे. त्यामुळे एकजुटीने तुटून पडा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
बीडमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या निम्मे लोकांनी शेतात काम करावे. निम्मे लोकांनी आंतरवलीत यावे. कामे उरूकन घ्या सरकार स्थापन झाले की मी सराटी अंतरवाली येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार आहे.
मराठा समाजाने आता निवडणूक डोक्यातून काढून टाकावी. आता लढाई लेकरांच्या भविष्यासाठी आहे. कारण लेकाराला उद्या ॲडमीशन घ्यायचे आहे. त्याला इंजिनियर, डॉक्टर, तहसीलदार, पोलिस करायचे आहे.
त्याला आरक्षणाची गरज आहे. ज्याला तुम्ही मतदान केले आहे, त्या पक्षातील नेत्यांना सांगा. तो कोणत्याही पक्षाचा असेलतरी मराठा आरक्षणासाठी भांडायला लावा, असे आवाहन त्यांनी केले.





