Bramati News : “वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा” – न्यायमूर्ती संदीप मारणे

बारामती : माध्यमे जवळ आल्याने एका क्लिक मध्ये हवे ते संदर्भ मिळतात त्यामुळे वकिली सोप्पी झाली आहे. त्यासाठी वकिलांनी आधुनिकतेचा वापर केला पाहिजे असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांनी बारामती येथे सातत्यपूर्ण कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत वकिलांना मार्गदर्शन भाषणात व्यक्त केले.
बारामती वकील संघटना अध्यक्ष प्रभाकर बर्डे व वकील संघटनेचे सदस्य यांचे वतीने बारामती, इंदापूर, दौंड, फलटण तालुक्यातील वकिलांसाठी रविवारी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र के महाजन ,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे अध्यक्ष अँड संग्राम देसाई, ॲड डॉ सुधाकर आव्हाड, ॲड राजेंद्र उमाप , बारामती चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही सी बर्डे, जिल्हा न्यायाधीश आर के देशपांडे, ॲड.गजानन चव्हाण, पुणे बार असो अध्यक्ष ॲड संतोष खामकर, ॲड गिरीश शहा, प्रशांत गिरमकर, बापूसाहेब सरक आदी. मान्यवर यावेळी हजर होते.
मारणे पुढे म्हणाले की, जसे न्यायाधीश एक चांगला वकील घडवत असतो तसेच वकील देखील चांगला न्यायाधीश घडवत असतो. वकिलांनी आपली छाप पाडण्यासाठी आधुनिकतेचा वापर करीत उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या नवनवीन न्याय निर्णयांचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासपूर्ण खटले चालवले तर वकीलीमध्ये चांगले करीयर करता येवू शकते असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक मध्ये बारामती वकील संघटना अध्यक्ष ॲड प्रभाकर बर्डे यांनी कार्यक्रमासाठी समिती सदस्य व सहकारी ज्येष्ठ वकिलांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले व नवनवीन वकिलासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमित आयोजित करणार असल्याचे सांगितले अँड नितीन भामे यांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पाडली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
यावेळी झालेल्या सत्रामध्ये ॲड गजानन चव्हाण यानी मेडीकल ज्युरीस्प्रुडंट या विषयावर फौजदारी खटल्यात वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष घेताना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल माहिती दिली. तर ॲड संग्राम देसाई यांनी उलटतपास या विषयावर सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन ॲड अनिल होळकर यांनी केले तर आभार ॲड रमेश कोकरे यांनी मानले.





