Bhaskar Jadhav : ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री; भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल

Bhaskar Jadhav news : गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या एका मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर आणि त्यांच्या गुहागर तालुका अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.
या मेळाव्यात त्यांनी संघाचे तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना ‘बेडकाची’ उपमा देत, “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात, मला परिणामांची चिंता नाही,” असं आक्रमक विधान केलं. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
काय म्हणाले भास्कर जाधव?
निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यात माझं नाव गोवलं गेलं. ठाण्यातील एका राजकीय नेत्यालाही मी सोडणार नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले.
त्यांनी घनशाम जोशी यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. “जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर ठीक होतं, पण समाजाच्या नावाने पत्र लिहिल्याने मला वाईट वाटलं. माझ्याविरोधात पत्रं काढा, मी ती गटारात फेकून देईन,” असा थेट इशारा भास्कर जाधवांनी दिला.
मी कोणालाही सोडणार नाही
पुढे बोलताना म्हणाले, माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मी कधीच माफ करणार नाही. तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत मी अंगावर केसेस घेतल्या. पण जेव्हा माझ्या आईला शिव्या देण्यात आल्या, तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते. समोरासमोर लढण्याची त्यांची हिंमत नाही, म्हणून बदनाम करण्याचा डाव खेळला जातोय,” असं त्यांनी सांगितलं.
मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील
भास्कर जाधव यांनी गुहागरमधील कुणबी समाजाला सावध राहण्याचा सल्ला दिला. “मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं जाईल. उद्या तुमच्या घरी पूजा सांगायला कोणी आलं नाही, तर घाबरू नका, मी स्वतः पूजा सांगायला येईन,” असं म्हणत त्यांनी कुणबी समाजाला एकजुटीचं आवाहन केलं. त्यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर टीका करताना, “हे लोक स्वतःच्या घरी पूजा घालतात का, हे विचारा,” असा टोला लगावला





