BPL Match Fixing : क्रिकेट विश्वात खळबळ! मॅच फिक्सिंग प्रकरणात फ्रँचायझी मालकासह बड्या अधिकाऱ्यावर कारवाई
BPL Match Fixing : मॅच फिक्सिंग प्रकरणाच्या सखोल तपासानंतर दोन बड्या व्यक्तींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

BPL Match Fixing Scandal Charges Framed Against Chittagong Royals Owner And Durbar Rajshahi Official Suspended : बांगलादेश प्रीमियर लीगच्या (BPL) ११व्या आणि १२व्या हंगामातील मॅच फिक्सिंग प्रकरणाच्या सखोल तपासानंतर दोन बड्या व्यक्तींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. चट्टोग्राम रॉयल्सचे माजी मालक मोहम्मद अब्दुल कयूम राशीद आणि दरबार राजशाहीचे माजी संघ अधिकारी मोहम्मद अमीन खान यांच्यावर फिक्सिंगचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. दोघांनाही क्रिकेटच्या सर्व उपक्रमांतून तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, त्यांना नोटीस जारी करून १४ दिवसांच्या आत अधिकृत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चट्टोग्राम रॉयल्सच्या माजी मालकावर ४ गंभीर आरोप; फोन देण्यास दिला नकार!
अब्दुल कयूम राशीद यांच्यावर सामन्याचा निकाल पूर्वनियोजित (मॅच फिक्स) करण्याचा थेट प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय भ्रष्टाचाराची ऑफर आल्यानंतरही त्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही. तपासात असहकार्य करत त्यांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी आपला मोबाइल फोन देण्यास नकार दिला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत तपास प्रक्रियेत थेट अडथळे निर्माण केल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाचे मेसेज केले डिलीट; खेळाडूंना फिक्सिंगमध्ये खेचण्याचा प्रयत्न!
FIXING SCANDAL ⚠️
Two individuals linked to the Bangladesh Premier League have been charged by the BCB for alleged breaches of the ICC Anti-Corruption Code
• Md. Abdul Kayum Rashed — Former owner, Chattogram Royals
• Md. Amin Khan — Former team official, Durbar RajshahiThe… pic.twitter.com/qdSHF4Mv4B
— Cricbuzz (@cricbuzz) September 17, 2026
दुसऱ्या बाजूला, दरबार राजशाहीचे माजी अधिकारी मोहम्मद अमीन खान यांच्यावरही मॅच फिक्सिंग करणे आणि निकालावर प्रभाव टाकल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांनी खेळाडूंना आणि अन्य व्यक्तींना भ्रष्टाचारामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान अमीन खान यांनी अनेक संशयास्पद आणि महत्त्वाचे मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा स्पष्ट ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
१४ दिवसांत द्यावे लागणार उत्तर; बीपीएलच्या प्रतिमेला पुन्हा धक्का!
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराचा वाद उफाळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर अशी कारवाई झाली आहे. आता या दोघांना १४ दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर शिस्तपालन समिती सुनावणी घेऊन त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी किंवा शिक्षेची अंतिम घोषणा करेल. या कारवाईमुळे बांगलादेश क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.





