भंडारदरा धरणाने गाठला तळ; एक टीएमसी पाणीसाठा शिल्लक

राजूर – भंडारदरा परिसरात मान्सून दाखल झाला असला तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अद्यापही मान्सून दाखल झाला नसल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा स्थिर असून, धरणामध्ये केवळ १० टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे महत्त्वाचे धरण समजले जाते. याच धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. यावर्षी जायकवाडी धरणासाठी भंडारदरा धरणातून पाणी झेपावले गेल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा अगदी तळाला गेला आहे.
धरणामध्ये फक्त ११११ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस दाखल न झाल्याने नवीन पाण्याची आवक होण्यास अजूनही काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. भंडारदरा धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील उडदावणे, पांजरे या गावांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागले.
जर पावसाने विलंब केला तर भंडारदरा धरणातून आणखी पाणी धरणाच्या लाभक्षेत्रासाठी सोडले जाऊ शकते. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात बुधवारी (दि.१२) सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटघर व रतनवाडी येथे मंगळवारी दुपारी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याची माहिती उपलब्ध होत असून भंडारदरा धरणाच्या शाखेकडून पाऊस किती पडला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
मात्र, सतत तीन तास कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आदिवासी भागात भात पिकास रोपे टाकण्यास पुरेसा पाऊस नसल्याने रोपे, बी टाकण्यास उशीर होत असल्याने आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे .





