अखेर गूढ उकललं…! बीडमध्ये आकाशातून पडलेली दोन्ही दगडं ‘उल्कापिंडत’, शास्त्रज्ञांनी दिली महत्वाची माहिती

बीड : बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर दुसरा दगड शेतकऱ्यांच्या घराशेजारील गायरान जागेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच तहसिल प्रशासन आणि अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ गावात दाखल झाले होते. त्यांनी हे दोन्ही दगड ताब्यात घेतले असून आकाशातून पडलेले दोन्ही दगड उल्कापिंडत असल्याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव येथे काल (सोमवार) दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान आकाशामध्ये मोठा आवाज होऊन आकाशामधून तीन दगड कोसळले. यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला. हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून दगड खाली पडला. तसेच अन्य दोन दगड इतर शेतामध्ये पडले अशी माहिती गावकऱ्यांच्यावतीने देण्यात आली आहे. घरावर पडलेला दगड हा वेगळा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
तसेच दगड ज्यावेळी घरामध्ये पडला त्यावेळी हा दगड खूप गार असल्याचेही सांगण्यात आले. दगड नेमके कुठून पडले, तसेच पुन्हा संध्याकाळी ही घरावर दगड पडतील का या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी वडवणी तहसील प्रशासनाने भेट देऊन हा नेमका दगड कुठून आणि कसा पडला याची माहिती गावकऱ्यांकडून घेतली. तसेच पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे.
या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले होते. साधारण पाव किलो वजनाचा आणि आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आल्याने शेतकऱ्यासह परिसरात मोठे कुतूहल वाढले होते. काही खगोलीय अभ्यासकांनी निमगावला भेट देऊन या दगडांची पाहणी केली. अभ्यासाअंती, साधारण 80 सेंटीमीटर आकाराचे हे उल्कापिंड असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले शास्त्रज्ञ ?
बीडमध्ये घडलेली घटना ही आशनीपाताशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे . जी छायाचित्रने आम्हाला प्राप्त झाली, त्याच्यावरून हे काँड्राइड स्वरूपाचा उल्कापिंड असल्याचे आढळून येत आहे. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या घराचा पत्रा फोडून एकदा गड खाली पडला तर ज्या मुलांनी आकाशातून दगड खाली पडताना पाहिला त्यावरून तरी हा आशनीपाताचा प्रकार असावा असे जाणवत असल्याचे खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले आहे. लवकरच या उल्कापिंडाला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्याशास्त्रज्ञांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून त्याचा विश्लेषण करण्यात येईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल, असं शास्त्रज्ञ यांनी सांगितले.





