सातारा – वाई मतदार संघात बंडखोरीमुळे दोन्ही आघाड्या त्रस्त

संदीप राक्षे
सातारा – सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या डोकेदुखी वाढू लागली आहे. बंडखोरांनी येथे स्वतंत्र दंड थोपटण्याची तयारी केल्याने बंडोबांना शांत करण्याची मोठी जबाबदारी नेत्यांवर असणार आहे. वाई मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी अर्ज भरल्याने आघाडी धर्माला हरताळ फासला गेला आहे. तर महाविकास आघाडी कडून डॉ. नितीन सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने बावधन गटाने स्वतंत्र भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा दोन्ही आघाड्यांकडे तिकीट मागूनही त्यांना अद्याप यश न आल्याने खंडाळा तालुक्याच्या अस्मितेसाठी उघड बंड पुकारले आहे.
या बंडखोरांना चुचकारणे आणि मत विभागणीचा फटका बसू नये म्हणून डॅमेज कंट्रोल करावे हा दोन्ही आघाड्यांच्या रणनीतीचा भाग असणार आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे वाई तालुक्यातील मकरंद आबांना महायुतीतूनच घरचा आहेर मिळाला. बोपे गावच्या पाटील घराण्यातच खासदार आमदारकीसह अनेक पदांचे केंद्रीकरण झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी सुद्धा याविषयी नाराजी व्यक्त करत त्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. गेली १५ वर्षे तालुका ताब्यात ठेवणाऱ्या विद्यमान आमदारांनी कोणत्याच भागाचा विकास केलेला नाही, असा माने यांचा आरोप आहे. शिंदे गटाच्या बांधणीमध्ये वाई तालुक्यात प्रदीप माने यांनी मोठा वाटा उचलला होता. मात्र, त्यांनीच बंडखोरी केल्याने येथील लढत रंगतदार होणार आहे.
शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी सुरुवातीपासूनच वेगळी भूमिका घेत महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, त्यांना कोणाकडूनच म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या ते सातत्याने संपर्कात असून अद्यापही त्यांनी मुंबई सोडलेली नाही. अजूनही त्यांना येथून महाविकासाकडे कडून संधी मिळेल अशी आशा आहे. दुसरीकडे भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मते आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक लढवायची की अनुकूल उमेदवाराला पाठिंबा द्यायचा या संभ्रमात ते आहेत. त्यामुळे भोसले गटाकडून या निवडणुकीत कोणता उलटफेर घडवला जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे. भोसले घराण्याच्या पुढच्या प्रतिनिधीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा मागे पडत चालली आहे.
लोणंदच्या सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक डॉ. नितीन सावंत यांच्या उमेदवारीची चर्चा कालपासून जोरात आहेत. सावंत हे मुंबईत तळ देऊन पवारांच्या संपर्कात आहेत. असे असताना शुक्रवारी रात्री बावधन गटांमध्ये शशिकांत पिसाळ यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन निष्ठावांतांना उमेदवारी न मिळाल्यास वेगळी भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांना महाविकास आघाडीचा वाई मतदार संघातील उमेदवार ठरवताना सगळी मते जाणूनच राजकीय दूरगामी निर्णय घ्यावा लागेल महायुती व महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडखोरीचा वणवा पेटलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महा विकास आघाडी काय निर्णय घेणार हा औत्सुक्याचा विषय आहे .





