Satara : सातारा जिल्ह्यात दोन्ही शिवसेना ॲक्शन मोडवर

सातारा : जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानेमहायुतीला ठेंगा दाखवत शक्य असेल तिथे ऑपरेशन लोटस राबवण्याचे धोरण ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात चाचपणीनंतर मेळावे घेण्याच्या मूडमध्ये असून शक्य तिथे स्वबळाची ताकद आजमावण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सध्या तरी जिल्ह्यामध्ये चाचणी करताना दिसून येत आहे.
शिवसेनेची विशेषतः ठाकरे गटाची गेल्या तीन वर्षांमध्ये झालेली पडझड महाराष्ट्राने पाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा पुकारल्यानंतर जिल्ह्यात शिंदे गटातच बहुतांश इन्कमिंग झाले. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाला आता अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. ठाकरे गटाचे पश्चिम महाराष्ट्र नेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे संपर्क दौरे गतिमान असले तरी शिवसैनिकांना म्हणावी तशी ताकद मिळत नसल्याची तक्रार आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचा मोठा मेळावा घेण्याची तयारी आखली जात असून त्यासाठी थेट मातोश्रीवर काही शिवसैनिक भेटून आल्याची माहिती आहे. मात्र, पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिने राजकारणापासून दूर असल्याने या राजकीय तयारीत व्यत्यय आला आहे. ठाकरे गटाने जिल्ह्यामध्ये अडीचशेहून अधिक शाखा आणि तीन हजारांपेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली आहे, असा दावा करत शिवसैनिकांना चार्ज करण्याचे काम सुरू केले आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना यांनी समन्वयाने एकत्र निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला असून त्याला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मिळणार आहे याचा समन्वय साधणारा आराखडा अद्याप पुढे आलेला नाही. मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी मूठ बांधण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
शिंदे गटाने सातारा शहरासह कोरेगाव, महाबळेश्वर या तीन ठिकाणी अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी उत्तर कोरेगावपासून परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या समन्वयक बैठकीला हजेरी लावली. मात्र, त्यानंतर पक्षाचे स्वतंत्र मेळावे घेण्याच्या सूचना झाल्याने त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. मेढा येथे झालेल्या मेळाव्यात शिवसैनिकांनी पक्ष संघटनेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गटाला वाढत्या जागा मिळायला पाहिजे, असा मनोदय बोलून दाखवला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या प्रभावासाठी…
एकनाथ शिंदे मूळचे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे घरच्या मैदानावर म्हणून त्यांना आपल्या नेतृत्वाचा राजकीय प्रभाव ठेवणे स्वाभाविक वाटत आहे. त्यामुळे महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव या ठिकाणी बांधणी गतीमान झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील सक्रिय सदस्यांना शिंदे गटात सामील करून घेतले जात आहे. शंभूराज देसाई यांच्याबरोबर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांनी संघटन बांधणी गतिमान केली आहे. तर सातारा शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नीलेश मोरे यांनी शक्य तितकी मोट बांधणी गतिमान करत साताऱ्यातूनही शिंदे गटाला किमान काही जागा मिळाव्यात असे साकडे खासदार श्रीकांत शिंदे यांना घातले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना साताऱ्यात मोरे गट आणि रणजितसिंह निंबाळकर यांना बरोबर घेऊन चालावे लागणार आहे. कराडमध्ये सुद्धा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, संभाजीराव पाटील, माथाडी विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत शिंदे यांनी संघटन बांधणीच्या दृष्टीने छोटे- मोठे मेळावे आणि संपर्क अभियान गतिमान केले आहे.
सातारा शहरात महायुतीला ठेंगा
सातारा शहरामध्ये अ वर्ग असणाऱ्या सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आपलेच निष्ठावंत कार्यकर्ते पुढे आणण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत भाजपच्या निष्ठावांतांना न्याय मिळावा, अशी एक मागणी पुढे येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निवडणूक भाजपच्या पक्षचिन्हावर आणि नगराध्यक्ष भाजपचा असे आदेश शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राजांच्या समर्थकांच्या गर्दीमध्ये भाजपचा निष्ठावंत भरडला जात आहे. त्याचबरोबर शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या सुद्धा साताऱ्यात प्रतिनिधित्व मिळण्याच्या अपेक्षा माफक आहेत. मात्र, त्यांची राजकीय ताकद साताऱ्यात नगण्य असल्यामुळे तेथून किती प्रभावीपणे ती मागणी होईल हे सांगता येणार नाही. शिंदे गटाकडून उदयनराजे यांच्याकडे तीन जागांची मागणी होऊ शकते, असा अंदाज आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी कराडमध्ये ऑपरेशन लोटस राबवत कराड दक्षिणमध्ये भाजपचा वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.





