दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने; एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाही स्वतंत्र मेळावे

पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असतानाच, आज पुण्यात या दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा बालेवाडी स्टेडियमवर, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. त्यामुळे वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एकदा ‘पवार वि. पवार’ असा राजकीय सामना रंगणार आहे.
पक्षाच्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापनदिन आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही गट एकमेकांविरोधात रिंगणात उतरले. पवार कुटुंबीयांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत टोकाची टीका करण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर संघर्ष मवाळ झाला आहे.
अनेक कौटुंबिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसू लागले आहेत. त्यातच शरद पवार गटातील काही आमदार- खासदारांनी खुलेपणाने अजित पवार गटात जाण्याची भूमिका घेतल्याने एकत्र येण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असताना, दोघांकडून वेगवेगळी विधाने करून राजकीय गुगली टाकली जात आहे. पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त काही निर्णायक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पुण्यात स्वतंत्र मेळावे घेऊन त्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. आजच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही गटांकडून कोणती राजकीय दिशा स्पष्ट होते, दोन्ही पक्ष एकत्र येणार का, यावर दोघांचे काय वक्तव्य असेल, याकडे संपूर्ण राज्याचे नव्हे, तर देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आणि हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे या मेळाव्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत दोन्ही पक्षांची असलेली भूमिका आणि ते एकत्र येणार का, हे अधिक स्पष्ट होणार असून हे दोघे काय बोलणार, यावर राज्यातील राजकीय गणितेही निश्चित होणार आहेत.





