ऐन दिवाळीत ‘मिस केरळ’स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही मॉडेलचा अपघातात जागीच मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना तिकडे केरळमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. केरळमधील कोच्चीमध्ये एका भीषण अपघातामध्ये दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघींचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुअनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला असल्याचे म्हटले आहे. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे. तर या अपघातामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
एका वृत्तसंस्थेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. गाडीच्या डॅशबोर्ड खालील कप्प्यांमधून गाडीचे कागदपत्रही आम्हाला काढता आले नाही, असे पोलीस सांगितले आहे. या अपघातामध्ये ब्यूटी क्वीन असणाऱ्या दोन तरुणींचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या फोर्ड फिगो गाडीमध्ये असणाऱ्या इतर दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती फारच चिंताजनक आहे. त्या व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. तर दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अनसी आणि अंजना या दोघींनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाला तेव्हा सीटबेल्ट लावलेले होते की नाही ते फॉरेन्सिक तपास आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल असे पोलीस म्हणाले. सध्या या प्रकरणामध्ये रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





