AAP आणि BJP दोघेही खोटे – काँग्रेस

नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिल्लीच्या संदर्भात काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची विरोधी पक्षांच्या मतांचे जमवाजमव सुरू असतानाच कॉंग्रेसने मात्र आम आदमी पार्टीवर जोरदार प्रहार केला आहे. तसे करताना या पक्षाने भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य केले आहे.
केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या संदर्भात आपला पाठिंबा द्यायचा का याचा विचार करण्यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 29 तारखेला बैठक बोलावली आहे. मात्र त्यापूर्वीच आज अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो शेअर करत कॉंग्रेसने आपवर हल्ला चढवला आहे. आप आणि भाजप दोघे एकच असून दोघेही फेक म्हणजे खोटे आहेत.
मोदी सरकार म्हणजे जुमला आणि भ्रष्टाचार आहे तर केजरीवाल सरकार म्हणजे हवाला आणि घोटाळा आहे असे कॉंग्रेसने म्हटले आहे. केजरीवाल यांना पाठिंबा देण्यात दिल्ली कॉंग्रेसच्या नेत्यांचा कट्टर विरोध असून गेल्या तीन दिवसांपासून कॉंग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे हा विरोध व्यक्तही केला आहे.
आता खर्गे यांनी बोलावलेल्या बैठकीत कॉंग्रेस काय निर्णय घेते हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या संबंधित विधेयकाला निष्प्रभ करण्यासाठी केजरीवाल यांना राज्यसभेत कॉंग्रेसच्या पाठिंब्याची नितांत आवश्यकता आहे.





