#CoronaVirus : प्रतिष्ठेची बोस्टन मॅरेथॉन स्थगित

बोस्टन – आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील सर्वात मानाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी बोस्टन मॅरेथॉन करोनाच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आता येत्या 14 सप्टेंबरला होईल असे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले आहे.
जगभरातील स्पर्धकांसाठी या मॅरेथॉनचे विजेतेपद मिळविणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपल्या देशाकडून खेळणे जसे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ही मॅरेथॉनही देशाकडून खेळण्यासाठी प्रत्येक धावपटू प्रयत्नशील असतो, यंदा मात्र करोनाचा धोका समोर असताना ही स्पर्धा आयजित करणे शक्य नाही म्हणूनच ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी जवळपास 30 हजार स्पर्धकांनी सहभाग निश्चित केला होता. तसेच ही स्पर्धा पाहण्यासाठी स्पर्धकांच्या तीन पट जास्त प्रेक्षक उपस्थित राहतात. यंदा जर ही स्पर्धा याच महिन्यात घेतली असती तर इतक्या लोकांचे जीव धोक्यात आले असते. त्यामुळेच ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.





