Borghat Traffic Update : खंडाळा घाटात अनेक गाड्या पडल्या बंद; सात ते आठ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
Borghat Traffic Update ; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढला; अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांची मोठी रांग, महामार्ग पोलिसांची दमछाक.

Borghat Traffic Update – मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील खंडाळा बोरघाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही भीषण वाहतूक कोंडी झाली. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटदरम्यान तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात अंडा पॉईंट परिसरातही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान अनेक वाहने बंद पडली, त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे व उपनगरांतून पुणे, लोणावळा व मावळ परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट परिणाम मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीवर झाला असून, पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठी कोंडी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वाहने तासन्तास एकाच ठिकाणी अडकून पडल्याचे चित्र दिसून आले.
वाहतूक कोंडीदरम्यान खंडाळा घाटात अनेक हलकी व अवजड वाहने बंद पडली.सतत ब्रेक–क्लच वापरामुळे काही वाहनांची क्लच प्लेट जळली तर अनेक गाड्यांचे इंजिन गरम झाल्याने त्या रस्त्यातच थांबल्या. यामुळे आधीच संथ असलेली वाहतूक अधिकच विस्कळीत झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलीस व खोपोली पोलिसांनी कसरतीचे प्रयत्न केले.दर पंधरा मिनिटांनी वाहतूक ब्लॉक करून हळूहळू वाहतूक पुढे सोडण्यात येत होती. मात्र वाढलेली वाहनसंख्या पाहता वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तहसीलदार अभय चव्हाण यांची सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी २४ जानेवारी रोजी जुना मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करताना अनुभवलेली परिस्थिती सोशल मीडियावर मांडली आहे. त्यांनी त्या माध्यमातून काही कारणे नमूद केली आहेत. नवख्या चालकांकडून होणारा बेशिस्तपणा, मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढलेली संख्या, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस व स्वयंसेवकांची अपुरी संख्या, एक्सप्रेस वेवरून वाहने उलट दिशेने सोडल्यामुळे जुन्या महामार्गावर ताण आणि लेन शिस्त न पाळल्याने समोरासमोर वाहने आल्यामुळे कोंडीत भर पडली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.





