khalapur News : खालापूरमध्ये महिला उमेदवारांना मोठी संधी ; किती प्रभाग महिलांसाठी राखीव? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली आरक्षण सोडत अखेर जाहीर करण्यात आली आहे. खालापूर पंचायत समितीतील आठ प्रभागांसाठीची आरक्षण सोडत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपजिल्हाधिकारी सुखदेव सोनवणे आणि तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीनंतर काही ठिकाणी आनंदाचे तर काही ठिकाणी निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आरक्षण सोडतीनुसार वासांबे, वाशिवली, सावरोली, आत्करगाव, खानाव, रिस, चौक आणि हाळखुर्द हे आठ प्रभाग जाहीर झाले असून त्यापैकी चार प्रभाग महिलांसाठी राखीव ठरले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार चौक – अनुसूचित जमाती महिला, हालखुर्द – अनुसूचित जमाती, वासंबे – नागरी मागास प्रवर्ग, वाशिवली – नागरी मागास प्रवर्ग महिला, सावरोली – सर्वसाधारण महिला, आत्करगाव – सर्वसाधारण महिला, खानाव – सर्वसाधारण, रिस – सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यापैकी चार महिला प्रभागांमुळे महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाली असली तरी काही अनुभवी आणि अपेक्षेने तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले आहे. आरक्षणाच्या निकालामुळे काही गणांमध्ये राजकीय गणितेच बदलली असून निवडणुकीची समीकरणे नव्याने मांडली जात आहेत.विशेष म्हणजे, पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे आगामी निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांनी आपापल्या रणनीतींवर पुनर्विचार सुरू केला आहे.
सहा वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जाते. सोडत जाहीर होताच सभागृहात काही ठिकाणी समाधान, तर काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटले आहेत.या सोडतीवेळी उपजिल्हा अधिकारी पुरवठा विभाग सुखदेव सोनवणे, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नायब तहसीलदार विकास पवार यासह अन्य शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.





