सीमा सुरक्षा दल प्रमुखांची काश्मीर सीमा चौक्यांना भेट

जम्मू – बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी बुधवारी जम्मूच्या अखनूर सेक्टरमधील विविध सीमा चौक्यांना भेट दिली. सीमेपलीकडील आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी प्रभावी वर्चस्व राखण्यासाठी त्यांनी यावेळी सैनिकांना प्रोत्साहित केले.
अग्रवाल यांच्यासोबत सीमा सुरक्षा दलाचे विशेष महासंचालक (पश्चिम कमांड) पीव्ही रामा शास्त्री आणि महानिरीक्षक डीके बुरा हेही उपस्थित होते. यावेळी अग्रवाल यांनी सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला, असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.
अग्रवाल सोमवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मू येथे पोहोचले. त्यांनी मंगळवारी सांबा जिल्ह्यातील सीमेला भेट दिली. त्यावेळी त्यांना पाकिस्तानकडून ड्रोन आणि तस्करीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
सीमेला भेट देण्यापूर्वी तेथील स्थितीच्या संबंधात बीएसएफ प्रमुखांना विस्तृत सादरीकरण देण्यात आले. अग्रवाल यांना सेक्टर आणि बटालियन कमांडर्सनी प्रत्यक्ष जमिनी स्थितीबाबत माहिती दिली.





