Border–Gavaskar Trophy 2024-25 : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला कधी जाणार? पहिली टेस्ट खेळण्याबाबत मोठी अपडेट आली समोर…

Border–Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, परंतु भारतीय संघ पुढील काही दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, जेणेकरून ते तेथील परिस्थितीशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकेल.
आता मोठा प्रश्न असा आहे की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत रवाना होणार का? मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, रोहित शर्मा टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मात्र, तो पहिल्या कसोटीत खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकणार…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा लवकरच पिता होणार आहे. यामुळे त्याला पर्थ कसोटीला मुकावे लागू शकते. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार असला तरी पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. यापूर्वी न्यूझीलंड मालिकेदरम्यान रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्या उपलब्धतेबद्दल विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना तो म्हणाला की, “हे अजून निश्चित नाही, पण पुढे काय होते ते मी बघेन…!” मात्र, सध्या अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये वैयक्तिक कारणांमुळे तो पर्थ कसोटीत खेळणार नसल्याचा दावा केला जात आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा रस्ता भारतासाठी बिकट…
नुकतेच भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध त्याच्याच भूमीवर लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. किवी संघाने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप करून इतिहास रचला. या पराभवानंतर भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा मार्ग कठीण झाला आहे. आता भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी कसल्याही परिस्थितीत जिंकाव्याच लागणार आहेत.





