Australia A vs India A 2nd unofficial Test : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी, दोन देशांच्या अ संघांमध्ये दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. 7 नोव्हेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत कांगारूंनी टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने मालिका 2-0 अशी खिशात घातली. टीम इंडियाला पहिल्या कसोटीत 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
भारत अ संघाने पहिल्या डावात प्रथम खेळून सर्वबाद केवळ 161 धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने संघाकडून सर्वाधिक 80 धावा केल्या. केएल राहुल 04, साई सुदर्शन 00 आणि कर्णधार रुतुराज गायकवाड केवळ 04 धावा करू शकले. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून मायकेल नेसरने 4 आणि ब्यू वेबस्टरने 3 बळी घेतले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 223 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मार्कस हॅरिसने 74 धावांची खेळी केली. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 4 आणि मुकेश कुमारने 3 बळी घेतले. तसेच खलील अहमदला दोन यश मिळाले.
पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या डावातही भारत अ संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. त्याने 68 धावा केल्या पण केएल राहुल (10),अभिमन्यू (17), साई सुदर्शन (03) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड(11) पुन्हा फ्लॉप ठरले तर नितीश रेड्डीने 38 धावांचे, तनुष कोटियनने 44 धावांचे, प्रसिद्ध कृष्णाने 29 धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या 229 पर्यंत नेत भारताची आघाडी 167 पर्यंत नेली.
विजयासाठी 168 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने केवळ चार विकेट गमावल्या आणि विजयाची नोंद केली. एकवेळ ऑस्ट्रेलिया अ संघाची स्थिती 4 बाद 73 अशी झाली होती. यादरम्यान त्यांनी मार्कस हैरिस (00) आणि कैमरून बैनक्रॉफ्ट (00), नाथन मैकस्वीनी (25), ओलिवर डेविस (21) यांच्या विकेट गमावल्या होत्या पण त्यानंतर सॅम कॉन्टासने नाबाद 73 आणि ब्यू वेबस्टनं नाबाद 46 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णानं 2, मुकेश कुमार आणि तनुश कोटियन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Australia A defeated India A by 6 wickets in the second unofficial Test match to win the series 2-0 🏆⭐#Cricket #Test #AUSAvINDA pic.twitter.com/JEp8SUSkk8
— Sportskeeda (@Sportskeeda) November 9, 2024
22 नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू व्हायला फारसा वेळ उरलेला नाही. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने मालिका 2-0 ने खिशात घातली. या निकालानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाचे बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारतासमोर मनोबल वाढलेले असेल. कारण, केएल राहुल, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसीध कृष्णा यांच्यासह अनेक वरिष्ठ भारतीय संघातील सदस्यांची उपस्थिती असूनही, भारत अ संघाने मॅके आणि मेलबर्न दोन्ही सामने गमावले आहेत.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
दरम्यान, टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये, चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये आणि पाचवा आणि अंतिम कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाईल.