IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला धक्का, ‘या’ दिग्गजानं घेतली निवृत्ती…

Border Gavaskar Trophy 2024-25 (IND vs AUS) : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियन भूमीवर होणारी ही ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
वेडला गेल्या तीन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळत नव्हते. तो 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळला होता. असं असलं तरी वेडला टी-20 मध्ये संधी मिळत होती. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेड ऑस्ट्रेलिया संघाचाही एक भाग होता. त्याने भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळला, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
36 Test matches. 97 ODIs. 92 T20 Internationals.
Congratulations to Matthew Wade on an outstanding international cricket career! pic.twitter.com/SDWl1OhqZC
— Cricket Australia (@CricketAus) October 29, 2024
आपल्या कारकिर्दीत त्याने ऑस्ट्रेलियाकडून 225 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 36 वर्षीय खेळाडूने T20 विश्वचषकाच्या तीन आवृत्त्यांमध्ये भाग घेतला होता. तोच मॅथ्यू वेड ज्याने 2021 च्या टी-20 विश्वचषकात शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत विजय मिळवून दिला होता. त्याची सर्वात संस्मरणीय कामगिरी 2021 मध्ये झाली जेव्हा त्याने आपल्या संघाला उपकर्णधार म्हणून जेतेपद मिळवून दिले. त्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक उपांत्य फेरीत वेडने 17 चेंडूत 41 धावांची नाबाद खेळी खेळली होती. यादरम्यान त्याने गोलंदाज शाहीन आफ्रिदीची यथेच्छ धुलाई केली होती.
यष्टीरक्षक -फलंदाजाने ऑस्ट्रेलियासाठी 36 कसोटी सामनेही खेळले, ज्यात चार कसोटी शतके आणि पाच अर्धशतकांसह 29.87 च्या सरासरीने 1,613 धावा केल्या. त्याने 97 एकदिवसीय सामने देखील खेळले, 83 डावांमध्ये 26.29 च्या सरासरीने 1,867 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 134.15 च्या स्ट्राइक रेटने 26.03 च्या सरासरीने 1,202 धावा केल्या. त्याने टी-20 प्रकारात 80 च्या सर्वोत्तम स्कोअरसह तीन अर्धशतके झळकावली.
निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून करणार काम….
तथापि, वेड ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेट खेळत राहील आणि जगभरातील फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये दिसेल. या अनुभवी खेळाडूचा पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासोबतच तो त्याचा कोचिंग प्रवासही सुरू करणार आहे.
8 महिन्यांत दुसऱ्यांदा केली निवृत्तीची घोषणा …
मार्चमध्ये शेफिल्ड शील्ड फायनल खेळल्यानंतर वेडने याआधी प्रथम श्रेणी रेड बॉल फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तब्बल 8 महिन्यांनंतर वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.





