Border–Gavaskar Trophy 2024-25(Ricky Ponting) : – आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यातील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. यापूर्वी भारताने सलग दोन मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र, न्यूझीलंड विरुद्ध भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ बॉर्डर-गावस्कर मालिका आरामात जिंकणार असल्याचे भाकीत ऑस्टेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने एका कार्यक्रमात केले.
बांगलादेश विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघावर नक्कीच दबाव असणार आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी हा दौरा निश्चितच सोपा नसेल. त्यातच भारताची आघाडीच्या फळीचे निराशाजनक प्रदर्शन हा देखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आगामी मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ हा प्रबळ दावेदार असून ही मालिका ऑस्ट्रेलिया ३-१ अशी जिंकेल अशी भविष्यवाणी रिकी पॉन्टिंगने केली आहे. भारताने २०१४-१५ पासून सलग बॉर्डर -गावस्कर करंडकावर आपली मोहोर लावली आहे. यामध्ये २०१८-१९ व २०२१-२२ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्याची किमया केली होती.
शमीची कमतरता जाणवणार
गेल्या मालिकेमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दबावात असल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी शमी दुखापतींमुळे गेल्या वर्षभरापासून संघात नाही. त्यामुळे शमीची कमतरता भारतीय संघाला नक्कीच जाणवणार आहे. या संदर्भात बोलताना पॉन्टिंग म्हणाला, शमीच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि नवोदित हर्षित राणा यांचा समावेश असलेल्या भारताच्या गोलंदाजीतील आक्रमणात कमतरता दिसून येत आहे त्यामुळे भारतीय गोलंदाजी विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही. त्यामुळे पाहुण्या संघाला २० बळी मिळविणे हे आव्हान असणार आहे.
Border–Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडिया जोरदार पुनरागमन करू शकते – जोश हेझलवूड
कोहलीपेक्षा पंत धोकादायक
मधल्या फळीतील फलंदाज व यष्टिरक्षक असणारा ऋषभ पंत जास्त धोकादायक असणार आहे. ऋषभ पंत फलंदाजीसाठी उतरतो तेव्हा चेंडूची चमक कमी झालेली असते. अशा वेळी पंत हा जास्त धोकादायक असतो. सध्याच्या घडीला पंत देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे पॉन्टिंगच्या मते ऋषभ पंत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतो. ऋषभ पंतचे ऑस्ट्रेलियात रेकॉर्डही चांगले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना ७ कसोटीमध्ये ६२.४० च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. याचबरोबरीने त्याने १ शतक व २ अर्धशतके देखील झळकावली आहेत. मागील दौऱ्यावर असताना पंतने फलंदाजी करताना भारताला गाबा येथील कसोटीमध्ये विजय मिळवून देताना मालिका देखील जिंकून दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला विराट कोहलीपेक्षा पंत अधिक धोकादायक वाटत आहे.