Border-2 Movie Song: १९९७ मधील ‘बॉर्डर’ चित्रपटातील अजरामर गाणे ‘संदेशे आते हैं’ याने संपूर्ण देशाला वेड लावले होते. आता तब्बल २९ वर्षांनंतर जेपी दत्ता यांच्या बहुप्रतीक्षित ‘बॉर्डर २’ चित्रपटात या गाण्याचा नवा अवतार ‘घर कब आओगे’ या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निर्मात्यांनी आज या गाण्याचा ऑडिओ ट्रॅक अधिकृतपणे प्रदर्शित केला असून, या गाण्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आधुनिक संगीताचा साज लेवून आलेल्या या गाण्याला सोशल मीडियावर अवघ्या काही तासांतच लाखो श्रोत्यांची पसंती मिळत आहे. या गाण्याला खास बनवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील ९ दिग्गजांना एकत्र आणण्यात आले आहे. गायक सोनू निगम आणि अरिजीत सिंग यांची जुगलबंदी हे या गाण्याचे मुख्य आकर्षण ठरत असून, सोबतच दिलजीत दोसांझ, विशाल मिश्रा आणि रूप कुमार राठोड यांच्या आवाजाचा मिलाफही यात ऐकायला मिळत आहे. या गाण्याच्या लेखणीत जावेद अख्तर आणि मनोज मुंतशिर यांचा सहभाग असून संगीताची जबाबदारी मिथुन यांनी सांभाळली आहे. मूळ संगीतकार अनु मलिक यांनी या नव्या व्हर्जनबद्दल आनंद व्यक्त केला असून, सोनू आणि अरिजीतचा आवाज गाण्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘हे राष्ट्रगान असून भारताच्या आत्म्यातून जन्मलेले गाणे आहे’ अशा शब्दांत या गाण्याचे वर्णन केले आहे. ऑडिओ रिलीज झाल्यानंतर आज सायंकाळी ६ वाजता या गाण्याचा व्हिडिओ देखील प्रदर्शित केला जाणार आहे. देशाप्रती असलेले प्रेम आणि सैनिकांच्या भावना व्यक्त करणारे हे गाणे पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये आतापासूनच कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.