Satara News : पुस्तकप्रेमी संमेलन सर्वांना खुले

सातारा : येथील आम्ही पुस्तकप्रेमी समुहाच्यावतीने रविवारी दि. २१ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘वाचू आनंदे’ साहित्य संमेलन सर्वांसाठी खुले आहे, अशी माहिती आयोजकानी दिली आहे. आम्ही पुस्तकप्रेमी हा सातारा जिल्हा आणि आसपासच्या परिसरांतील साहित्यिकांचा आणि वाचकांचा एक व्हॉट्स अप समूह चार वर्षांपूर्वी सुरू झाला.
या समूहातर्फे अखंड दररोज एका नवीन पुस्तकाचा परिचय करून दिला जातो आणि साहित्यविषयी इतर उपक्रम आठवड्याला साजरे होतात त्यामध्ये लेखक तुमच्या भेटीला तसेच चित्रपट, कविता यांचे परीक्षण, नाट्य परीक्षण असे उपक्रम साजरे होतात.
बघता बघता या समूहाची लोकप्रियता सातारा जिल्हा सोडून महाराष्ट्र, भारत आणि परदेशात देखील पोचली आणि सध्या त्याचे साडेतीनशे पेक्षा जास्त सभासद सदस्य आहेत. प्रत्येक वर्षी साहित्य रसिकांचे एक स्नेहसंमेलन होते यावर्षीचे हे तिसरे संमेलन सातारा येथे न्यू इंग्लिश स्कूल मधील गणेश हॉल येथे रविवारी आयोजित करण्यात आले आहे.
यावर्षी या संमेलनामध्ये उदघाटक म्हणून कादंबरीकार आणि अभिजात मराठी समितीचे अध्यक्ष रंगनाथ पाठारे आणि अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी हे लाभले आहेत. यामध्ये कवी संमेलन दोन परिसंवाद आणि सभासदांचा माझे लेखन आणि माझे वाचन ते कार्यक्रम आहेत.
समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ माध्यम लेखक आणि मुलाखतकार डॉ. उदय निरगुडकर आणि स्वयं टॉक्स या संस्थेचे सहसंस्थापक नवीन काळे आहेत. हा कार्यक्रम सर्व साहित्य रसिकांना मोफत आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.





