मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये माजी केंद्रीयमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याकडून आव्हान देण्यात आले आहे. काय आहे नेमके प्रकरण? नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीतील विजय बेकायदेशीर आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मिळवला आहे. असा आरोप विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यामध्ये नारायण राणे अन् निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर १२ सप्टेंबरपर्यंत म्हणणं मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. विनायक राऊतांनी याचिकेमध्ये काय केले आरोप ? ‘नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून आणि पैसे वाटून निवडणूक जिंकली आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील निवडणूक रद्द करावी आणि राणेंना आगामी पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.’ असे विनायक राऊत म्हणाले आहेत.