Bomb attack | BJP leader – पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मनोरंजन कालिया यांच्या घरातील बॉम्बस्फोट प्रकरण पोलिसांनी १२ तासांत सोडवले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या सूत्रधाराचे नाव झीशान अख्तर असे असून तो लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. या स्फोटात सहभागी असलेली ई-रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. कालिया यांच्या घरावर काल रात्री १ वाजेच्या सुमारास बॉम्ब फेकण्यात आला होता. पंजाबमधील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी हा हल्ला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने आयएसआयने करवून आणला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याचा मास्टरमाइंड झीशान अख्तर याची ओळख पटली आहे तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणीही झीशान अख्तर पोलिसांना हवा आहे. मनोरंजन कालिया हे माजी कॅबिनेट मंत्री आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत. पोलिसांनी सांगितले की, जालंधरमधील शास्त्री मार्केटजवळील कालिया यांच्या निवासस्थानी पहाटे १ वाजता मोठा आवाज ऐकू आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिस उपायुक्त मनप्रीत सिंह यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. सोमवारी रात्री ई-रिक्षातून तीन ते चार तरुण कालिया यांच्या घराजवळ येताना दिसले. कालियांच्या घरावर स्फोटक वस्तू फेकून ते पळून गेले. स्फोटक घराच्या आत त्यांच्या कारजवळ पडले. मोठ्या स्फोटामुळे कारसह घराच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या. जमिनीवर एक खड्डा देखील झाला आहे. घटनेच्या वेळी मनरंजन कालिया घरी झोपले होते. ते आणि त्याचे कुटुंब सुरक्षित आहेत. जालंधरच्या पोलिस आयुक्त धनप्रीत कौर यांनी पत्रकारांना सांगितले की, पहाटे १ वाजता आम्हाला येथे स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. आम्ही सीसीटीव्हीवरही लक्ष ठेवून आहोत. हा ग्रेनेड हल्ला आहे की आणखी काही याचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे.