Shreyas Talpade : भेसळीचा धसका.! ‘आम्ही घरात दूध-पनीर बंदच केलं…’; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर श्रेयस तळपदे काय म्हणाला, पाहा…
घरी आठवड्यात अनेक वेळा पनीर किंवा दुधाचे पदार्थ बनायचे. आता मात्र मुलीसाठीही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी केला आहे. मी रोज रात्री हळद घालून दूध प्यायचो, ते पूर्णपणे बंद केलं आहे.

Shreyas Talpade : अन्नपदार्थांतील भेसळ हा सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. दूध, पनीर, खवा, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमधील कथित भेसळीबाबत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचवेळी विविध ठिकाणी अन्नसुरक्षा विभागाकडून सुरू असलेल्या कारवायांमुळेही हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे.
अशा पार्श्वभूमीवर अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या कुटुंबाच्या आहारात केलेल्या मोठ्या बदलांविषयी खुलासा केला आहे. आगामी ‘द इंडियन स्टोरी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने भेसळीच्या भीतीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी केल्याचे सांगितले.
एका मुलाखतीत श्रेयसने अन्नपदार्थांमधील भेसळीबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, ‘सोशल मीडियावर फिरणारे सर्वच व्हिडिओ खरे असतील असे नाही. काही व्हिडिओ जुने किंवा दिशाभूल करणारे असू शकतात. मात्र, त्याच्या मते सर्व माहिती पूर्णपणे खोटी मानून दुर्लक्षही करता येत नाही’.
श्रेयस म्हणाला, “सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंची सत्यता तपासणे गरजेचे आहे. आता तर वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी जी धडक मोहीम सुरू केली आहे, त्यातून भेसळीचं भीषण वास्तव उघड होत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही आमच्या घरातील डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर अत्यंत कमी करून टाकला आहे. विविध ठिकाणी प्रशासनाने सुरू केलेल्या कारवायांमुळेही हा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येते.”
यावेळी त्याने आपल्या आहारात झालेल्या बदलांचाही उल्लेख केला. “पूर्वी आमच्या घरी आठवड्यात अनेक वेळा पनीर किंवा दुधाचे पदार्थ बनायचे. आता मात्र मुलीसाठीही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी केला आहे. मी रोज रात्री हळद घालून दूध प्यायचो, ते पूर्णपणे बंद केलं आहे. चहातही आता अगदी थोडंसंच दूध असतं; अन्यथा मी ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी पिणं पसंत करतो,” असे तो म्हणाला.
घरात पनीर आणायचे असल्यास ते फक्त विश्वासार्ह ठिकाणाहूनच घेतले जाते, असेही श्रेयसने स्पष्ट केले. “आम्ही नॉनव्हेज खातो. घरात साधी खिचडी, बटाट्याची भाजी यांसारख्या पदार्थांनाही प्राधान्य दिलं जातं. बाजारातून आणलेल्या भाज्या शक्य तितक्या स्वच्छ धुवून आणि योग्य प्रकारे शिजवूनच वापरतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे शक्य आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असे त्याने सांगितले.
दरम्यान, अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये अन्नसुरक्षा विभागाकडून तपासणी मोहिमा सुरू आहेत. तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती आणि प्रमाणित स्रोतांवर भर द्यावा. त्याचबरोबर अन्नपदार्थ खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांची निवड करणे आणि संशयास्पद उत्पादने संबंधित यंत्रणांकडे तक्रारीद्वारे निदर्शनास आणून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.







