Sanjay Dutt : ‘त्या’ प्रकरणी संजय दत्तने मागितली महिला आयोगाची माफी; ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
संजय दत्तने भविष्यातील सर्व करारांमध्ये महिला आणि मुलांच्या सन्मानजनक सादरीकरणाबाबत कायदेशीर तरतुदींचा समावेश करण्याचे आश्वासन दिले.

Sanjay Dutt – सरके चुनर या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अभिनेता संजय दत्त याने सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजेरी लावून लेखी माफी सादर केली.
या गाण्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल खंत व्यक्त करत, प्रायश्चित्त म्हणून ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व स्वीकारण्याची घोषणा त्याने केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. या गाण्यातील अश्लीलता आणि महिलांच्या अश्लील सादरीकरणावर आयोगाने तीव्र आक्षेप नोंदवला होता.
सार्वजनिक जीवनातील वरिष्ठ कलाकारांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून काम करावे, असे ताशेरे आयोगाने यावेळी ओढले.
यावर उत्तर देताना संजय दत्तने भविष्यातील सर्व करारांमध्ये महिला आणि मुलांच्या सन्मानजनक सादरीकरणाबाबत कायदेशीर तरतुदींचा समावेश करण्याचे आश्वासन दिले.
याच प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही हिला देखील पाचारण करण्यात आले होते, मात्र ती परदेशात असल्याने तिने नवीन तारीख मागवून घेतली आहे.
तत्पूर्वी, ६ एप्रिल रोजी या गाण्याचे दिग्दर्शक किरण कुमार ऊर्फ प्रेम, गीतकार रकीब आलम आणि निर्मिती संस्थेच्या प्रतिनिधींनी आयोगासमोर हजर राहून माफी मागितली होती. सध्या हे वादग्रस्त गाणे युट्युबवरून हटवण्यात आले आहे.
कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी ते सामाजिक संवेदनशीलतेच्या मर्यादेत असावे, असे मत आयोगाने यावेळी मांडले.





