Huma Qureshi: कान्समध्ये हुमा कुरेशीची भन्नाट एन्ट्री; साऊथ सुपरस्टार यशसोबतच्या खास फोटोंनी वेधलं लक्ष!
Huma Qureshi यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हुमा कुरेशीचे वेगवेगळे लूक सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ती काळ्या रंगाच्या आकर्षक गाऊनमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने परिधान केलेली बनारसी साडीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही अंदाजात हुमा चाहत्यांना भावताना दिसत आहे.

Huma Qureshi: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये भारतीय कलाकारांचा जलवा पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहेत. अशातच अभिनेत्री हुमा कुरेशी हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत थेट साऊथ सुपरस्टार यश नसला, तरी त्यांची उपस्थिती खास पद्धतीने दिसून आली.
हुमा कुरेशीने कान्समधील काही मजेशीर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. या फोटोंमध्ये ती यश यांच्या फोटो असलेल्या एका मॅगझिनसोबत फिरताना दिसली. फोटोंसोबत तिने दिलेलं कॅप्शनही सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. “मी आणि यश कान्समध्ये फिरतोय,” असं तिने हलक्याफुलक्या अंदाजात लिहिलं. यासोबतच तिने ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या टीमची आठवण येत असल्याचंही सांगितलं.
हुमा कुरेशीची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी यशच्या स्टाईलचं कौतुक केलं, तर काहींनी हुमा कुरेशीच्या विनोदी स्वभावाचंही भरभरून अभिनंदन केलं. एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं की, “आता राधिका पंडित कान्सला जाण्याची तयारी करत असतील.” राधिका पंडित या यश यांच्या पत्नी आहेत. या कमेंटवरही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.
View this post on Instagram
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हुमा कुरेशीचे वेगवेगळे लूक सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ती काळ्या रंगाच्या आकर्षक गाऊनमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने परिधान केलेली बनारसी साडीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही अंदाजात हुमा चाहत्यांना भावताना दिसत आहे.
दरम्यान, हुमा कुरेशी आणि यश हे दोघेही ‘टॉक्सिक’ या बहुचर्चित चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे.
विशेष म्हणजे, या सिनेमात यश दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही ‘टॉक्सिक’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता कायम आहे.





