Supriya sule : करीना-करिश्माच्या संडे पार्टीत सुप्रिया सुळेंची हजेरी; बनवले खास पदार्थ, कॅप्शन मुळे रंगली चर्चा !
या पार्टीत बॉलिवूडच्या या दोन बहिणींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे.

Supriya sule : बॉलिवूडमधील कपूर कुटुंब म्हटलं की ग्लॅमर, गप्पा आणि खास सेलिब्रेशन यांची चर्चा होणारच. चित्रपटांपासून ते कौटुंबिक सोहळ्यांपर्यंत कपूर कुटुंबातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता या कुटुंबाच्या एका खास संडे पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी कुटुंबीयांसोबत रविवारचा दिवस खास पद्धतीने साजरा केला. मात्र, या पार्टीत बॉलिवूडच्या या दोन बहिणींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच अरमान जैनने स्वतः शेफची भूमिका निभावत पाहुण्यांसाठी खास पदार्थ बनवले. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
करीना-करिश्मासोबत सुप्रिया सुळेही पार्टीत सहभागी!
करीना आणि करिश्मा कपूर यांच्या आत्या रीमा जैन यांच्या घरी या खास कौटुंबिक गेट-टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. या फोटोंमध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर आणि सुप्रिया सुळे एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यांच्यासोबत अरमानचे आई-वडील रीमा जैन आणि मनोज जैन, पत्नी अनीसा मल्होत्रा तसेच भाऊ आदर जैन हेही उपस्थित होते. सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारत आणि जेवणाचा आनंद घेत रविवारची सुट्टी खास बनवली.
करीना कपूरनेही या भेटीची झलक आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली. या फोटोला तिने ‘रविवारची मस्ती’ असे कॅप्शन दिले होते. त्यामुळे या कौटुंबिक भेटीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्टीतील आणखी एक खास आकर्षण ठरला तो म्हणजे अरमान जैनचा कुकिंग अंदाज.
अरमानला स्वयंपाकाची विशेष आवड असून तो अनेकदा वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसतो. यावेळीही त्याने किचनचा ताबा स्वतःकडे घेतला आणि पाहुण्यांसाठी खास मेजवानी तयार केली. अरमानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फ्राइड सीफूड आणि फिश फ्रायचा खास बेत पाहायला मिळतो.
त्याने या पोस्टला ‘रविवारचा फॅमिली टाइम आणि काही उत्तम फ्राइड फूड’ असे कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे, करिश्मा कपूरनेही त्याच्या पोस्टवर ‘Too yummy’ अशी कमेंट करत पदार्थांचे कौतुक केले. त्यामुळे या पार्टीत केवळ कौटुंबिक गप्पाच रंगल्या नाहीत, तर अरमानच्या हातच्या पदार्थांचाही सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतल्याचे दिसते.







