लोणावळ्यात “सोशल डिस्टन्सिंग’चा बोजवारा

लोणावळा (वार्ताहर) – करोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने लॉकडाऊन घोषीत केला. काही अत्यावश्यक सेवा वगळता अनेक गोष्टींना पायबंदी घातली आहे. असे असताना लोणावळ्यात मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विशेषता भाजीपाला व फळे विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे.
या ठिकाणी ग्राहकांसह विक्रते कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने सोशल “डिस्टन्सिंग’चा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून यावर गांभीर्याने निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे, मात्र नागरिकांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढतच चालली आहे.
महाराष्ट्रात सध्या करोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगराच्या मध्यभागी लोणावळा शहर वसलेले आहे. त्यामुळे करोनाचे संक्रमण याठिकाणी केव्हाही पसरू शकते, अशी परिस्थिती आहे.
‘मॉर्निंग वॉक’ अन् शतपावलीवाले मोकाट
एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन सर्वत्र करण्यात येत आहे. लोणावळा शहरात मात्र “मॉर्निंग वॉक’ आणि शतपावली करणारी मंडळी या आवाहनाला अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावीत आहे. भांगरवाडी, लोणावळा धरण, वलवण, तुंगार्ली डॅम, तुंगार्ली नारायणीधाम रोड याठिकाणी रोजच्या रोज पहाटे आणि रात्री 9 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान नागरिक मोठमोठे गट करून बाहेर पडत आहे.





