Eknath Shinde : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ १ मे पासून सुरू; टोल वाढणार की नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Eknath Shinde : पुणे-मुंबई प्रवासातील २० ते ३० मिनिटांची बचत; सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसना मिळणार प्राधान्य.

Eknath Shinde – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवरून येत्या १ मे पासून वाहतूक सुरू होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवाशांचा सुमारे २० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. हा प्रकल्प सुमारे सहा हजार कोटींचा आहे. त्यामुळे मिसिंग लिंक सुरू झाल्यावर या मार्गावरील टोल वाढणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असून, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही.
खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. द्रुतगती मार्गाला पूर्णतः ऍक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल- फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून, प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. यामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील, असा दावा शिंदे यांनी केला. इंधनाची व वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसना प्राधान्य देण्यात येणार असून, घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल- स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे,






