Pimpri | महापालिकेचा ८६२ कोटी कर थकीत

पिंपरी, – पिंपरी-चिंचवड महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२४-२०२५) शहरातील तब्बल ३ लाख ८९ हजार मिळकतधारकांकडून ५३७ कोटी ३० लाख एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात यश आले. गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये हा विभाग काही अंशी कमी पडला आहे. त्यातच आजपर्यंत तब्बल ८६२ कोटी ७० लाख एवढा मालमत्ता कर थकीत असून तो वसूल करण्याचे आव्हान कर आकारणी व कर संकलन विभागापुढे निर्माण झाले आहे.
शहराच्या विविध भागातील महापालिकेच्या १७ विभागीय कर संकलन कार्यालयांमार्फत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र व इतर मिळकतींचा मालमत्ता कर वसूल केला जातो. चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाला एकूण ५३७ कोटी ३० लाख एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात यश आले. त्यामध्ये ४४७ कोटी ६१ लाख चालू मालमत्ता कर आणि ८९ कोटी ८० लाख एवढ्या थकीत कराचा समावेश आहे. गत आर्थिक वर्षात म्हणजे नोव्हेंबर २०२३ अखेर तब्बल ६३३ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात या विभागाला यश आले होते. याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात आज अखेरपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यामध्ये हा विभाग सुमारे १०० कोटींनी पिछाडीवर पडला आहे. सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी कर आकारणी व कर संकलन विभागातील मनुष्यबळ वर्ग करण्यात आले होते. त्याचा परिणाम यावर्षीच्या मालमत्ता कर वसुलीवर पडल्याचे जाणवत आहे.
ऑनलाइन कर भरण्यास पसंती
चालू आर्थिक वर्षात (२०२४-२०२५) मिळकतधारकांनी वेगवेगळ्या सुरुवात ५३७ कोटी ३० लाख एवढा मालमत्ता कर जमा केला. त्यामध्ये ऑनलाईन कर जमा करण्यासाठी देण्यात आलेल्या सुविधेचा सर्वाधिक मिळकतधारकांनी फायदा घेतला. ३६२ कोटी ७४ लाख एवढा कर ऑनलाईनद्वारे महापालिकेकडे जमा झाला. ४३ कोटी ६६ लाख एवढ्या रक्कमेचा कर मालमत्ताधारकांनी रोख स्वरुपात जमा केला. ३७ कोटी ९७ लाख एवढ्या कर रक्कमेचे धनादेश पालिकेला प्राप्त झाले. तर, ४२ कोटींचा कर आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधेमार्फत जमा झाला. तसेच, ३५ कोटी ४३ लाख एवढ्या रक्कमेचे समायोजन करण्यात आले आहे.
नोंदणीकृत मिळकती
निवासी – ५ लाख ४१ हजार १६८
बिगरनिवासी – ५७ हजार ७३३
औद्योगिक – ४ हजार ५०३
मोकळी जागा – ११ हजार ३२३
मिश्र – १ हजार ६०१
इतर – २ हजार ५०६
इतर – १४ हजार ४६०
एकूण ६ लाख ३३ हजार २९४
सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामात विभागातील अधिकारी, कर्मचारी व्यस्त होते. परिणामी, मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. त्याचा परिणाम काही अंशी मालमत्ता कर वसुलीवर पडला हे नाकारता येणार नाही. पुन्हा नव्या जोमाने वसुलीचे काम सुरु केले आहे. थकीत करासह चालू मागणी देखील वसुली करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे.
– अविनाश शिंदे,
सहायक आयुक्त,
कर आकारणी व कर संकलन विभाग





