BMC Election Result : हे आकडे खोटे आहेत..! मुंबईच्या निकालावर संजय राऊतांच मोठं विधान, भाजपावर केला गंभीर आरोप

Sanjay Raut | BMC Election Result : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे. काही महापालिकांमध्ये काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली असली, तरी एकूण चित्र महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.
मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंच्या प्रभावामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची कामगिरी लक्षवेधी ठरली असली, तरी भाजप व महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात भेट देत विजयी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
दरम्यान, या निकालात ठाकरे बंधूंना मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्विट करत निवडणूक निकालांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई महापालिका निकाल ‼️
‼️
सपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत,
६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत.
लढत अटी तटीची आहेच
पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे!
भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे!
दुपार नंतर शिवसेना मनसे…— Sanjay Raut (@rautsanjay61) January 16, 2026
खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, “मुंबई महापालिका निकाल..! संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, ६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत.
लढत अटी तटीची आहेच पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे! भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे! दुपार नंतर शिवसेना मनसे चे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत! पण न्यूज़ चैनल जुनाच आकडा दाखवीत आहेत! पाहू….” असं त्यांनी म्हंटलं आहे.





