BMC Election Result 2026: मुंबईतील यशानंतर तामिळनाडूतील भाजप नेते के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया…

BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 88 जागांसह मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे तामिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा उल्लेख ‘रसमलाई’ असा करत त्यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. अण्णामलाई यांनी ‘मुंबई हे महाराष्ट्राचे नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे’ असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता निकालानंतर अण्णामलाई यांनी पलटवार केला आहे.
अण्णामलाई यांनी या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला दिले आहे. “महाराष्ट्राच्या जनतेने निर्णायक कौल दिला आहे! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेले घवघवीत यश हे उद्देशपूर्ण आणि कामगिरी-आधारित शासनासाठी मिळालेला एक जोरदार जनादेश आहे. गावांपासून ते महानगरांपर्यंत, जनतेचा ‘ट्रिपल-इंजिन’ नेतृत्वावरील विश्वास हा निराधार विभाजनवादी प्रचारावर नव्हे, तर प्रगतीवर आधारित राजकारणाचा पुरावा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, ज्यांच्या गतिमान नेतृत्वाखाली प्रत्येक स्तरावर प्रशासनाची नवी व्याख्या केली गेली आहे आणि महाराष्ट्र भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनाच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र वेगाने एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे.” असे त्यांनी नमूद केले.
The people of Maharashtra have given a decisive verdict! The Mahayuti alliance’s sweeping success in the local body polls is a powerful mandate for purposeful, performance-driven governance.
From villages to metro cities, people’s trust in the triple-engine leadership stands…
— K.Annamalai (@annamalai_k) January 16, 2026





