Blade Attack On Girl : “माझा आवाज येत नाहीये, लवकर ये…” गळा चिरलेल्या अवस्थेत भावाला व्हिडिओ कॉल; चंदननगरमधील धक्कादायक घटना
Blade Attack On Girl : चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न; अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Blade Attack On Girl – चंदननगर येथे प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (२२, रा. चंदनगर, मूळ उत्तर प्रदेश) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलीप राठोड (२२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि .२९) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पठारेवस्ती चंदनगर परिसरात घडली. याबाबत तरुणीचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे (२५) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी उजालादेवी हे एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तेथे दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होते. त्याच कारणातून बुधवारी रात्री दिलीप हा तरुणी राहात असलेल्या पठारेवस्ती चंदननगर येथे आला.
त्याने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून पसार झाला. तरुणीवर हल्ला केला, तेव्हा ती घरात एकटीच होती. तिचा भाऊ आणि भावाची बायको बाहेर कामावर गेले होते. तरुणीने फोन करून आपल्या भावाला ही माहिती दिली. तू लवकर घरी ये. मला एका मुलाने मारले आहे. माझ्या गळ्यातून आवाज येत नाही.
त्यानंतर तरुणीने आपल्या भावालाच व्हिडिओ कॉल केला असता ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. भावाने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत तेथील काही नागरिक आणि तरुणीचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
तरुणीला तिला कोणी मारले, असे विचारले, तेव्हा तिला बोलता येत नव्हते. तिने इशारा करून पेन आणि कागद मागवून त्यावर दिलीप राठोड असे लिहिले. आरोपी राठोड अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.




