भाजपच्या चुकीच्या धोरणाचा सैनिकांना फटका; काँग्रेसचा केंद्रावर जोरदार हल्लाबोल !

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरच्या डोडा येथे झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी केंद्रावर जोरदार निशाणा साधला, राहुल गांधी यांनी याचे खापर भाजपच्याचुकीच्या धोरणांवर फोडले असून त्यांनी म्हटले आहे की, सुरक्षेत वारंवार होणाऱ्या त्रुटींची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे आणि कठोर भूमिका घेतली पाहिजे तसेच दोषींवर कारवाई केली पाहिजे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे की, एका अधिकाऱ्यासह चार शूर जवानांच्या हौतात्म्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. भारत मातेच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आमच्या शूरवीरांच्या कुटुंबियांना आमची पुर्ण सहानुभूती आहे आमचे विचार आणि प्रार्थना जखमींसोबत आहेत आणि आम्ही त्यांना लवकरात लवकर आणि पूर्ण बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.
भ्याड दहशतवाद्यांकडून केल्या जात असलेल्या या हिंसाचाराच्या कृत्यांचा तीव्र आणि स्पष्ट निषेध करण्यास कोणतेही शब्द पुरेसे नाहीत, असे ते म्हणाले. गेल्या ३६ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आमच्या सुरक्षा रणनीतीचे सावधगिरीने पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे.
मोदी सरकार असे वागत आहे की सर्वकाही ‘नेहमीप्रमाणे सुरू आहे आणि काहीही बदललेले नाही असा समज त्यांनी करून घेतला आहे. त्यांना हे माहित असले पाहिजे की वाढत्या प्रमाणात या हल्ल्यांचा फटका जम्मू प्रदेशाला बसत आहे,असे खर्गे म्हणाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमच्या शूर सशस्त्र दलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनही शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या.एकामागून एक अशा भयंकर घटना घडत असून त्या अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहेत. हे सततचे दहशतवादी हल्ले जम्मू आणि काश्मीरची बिघडलेली स्थिती दर्शवत आहेत. भाजपच्या चुकीच्या धोरणांचा फटका आमचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे, असे गांधी यांनी एक्सवरील हिंदीतील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते म्हणाले, सुरक्षेत वारंवार होणाऱ्या त्रुटींची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, ही प्रत्येक देशभक्त भारतीयाची मागणी आहे. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे,” असे गांधी म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, गेल्या ७८ दिवसांत एकट्या जम्मूमध्ये ११ दहशतवादी हल्ले झाले आहेत. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही या हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे.





