भाजपला मिळणाऱ्या मतांमध्ये होतेय वाढ : भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा

आगरतळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती बदलली. प्रत्येक वेळी अधिक मतं देऊन जनता मोदींना आशीर्वाद देत आहे. भाजपला मिळणाऱ्या मतांमध्ये वाढ होतेय, असे भाष्य भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी रविवारी केले. त्रिपुरा राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपच्या सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील दुसरे वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत नड्डा बोलत होते.
त्यावेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तसेच, भाजपच्या कामगिरीतील चढत्या आलेखाकडेही लक्ष वेधले. देशातील मागील ३ लोकसभा निवडणुकांचा विचार करता भाजपच्या मतांचे प्रमाण वाढलेले दिसते. पक्षाला २०१४ यावर्षी देशभरात १७ कोटी मतं मिळाली. त्यावेळी झालेल्या मतदानाचा विचार करता ते प्रमाण ३१.३० टक्के इतके होते.
पुढील निवडणुकीत (वर्ष २०१९) भाजपला २२ कोटी म्हणजे ३६.७ टक्के मतं प्राप्त झाली. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांमध्ये आणखीच भर पडली. आमच्या पक्षाला सुमारे २४ कोटी म्हणजे ३७ टक्के मतदारांनी कौल दिला, असे त्यांनी नमूद केले. सरकारविरोधी भावनेचे रूपांतर सरकारला अनुकूल भावनेत करून मोदींनी देशाची राजकीय संस्कृती बदलण्याची किमया केली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.





