Nanded loha Nagarparishad | नांदेड जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं आहे. घराणेशाहीवरुन काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपच्या या भूमिकेवर अनेकांनी निशाणा साधला आहे. लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याशिवाय नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यासोबतच मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे घराणेशाही चालत नाही असं मिरवणाऱ्या नेत्यांनीच पक्षातील उमेदवारी एकाच कुटुंबातील ६ जणांना दिली आहे. त्यामुळे सध्या लोहा नगरपरिषदेतील ही घराणेशाही चांगलीच चर्चेत आली आहे. लोहा नगर परिषदेत तिरंगी लढत नांदेड जिल्ह्यात 12 नगर परिषदा आणि एक नगर पंचायतीसाठी निवडणूक होतं आहे. ज्यात लोहा तालुक्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या लोहा नगर परिषदेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बाल्लेकिल्ला मानला जातो. आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. लोहा नगर परिषद एकूण दहा प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होतं आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. ज्यात नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग ७ अ) मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना (प्रभाग क्रमांक १ अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग ८ अ) मधून, मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) मधून, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत आहे. चव्हाण हे भाजपावासी झाल्यापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. मात्र लोहा नगर परिषदेसाठी भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे. हेही वाचा: pune : सरोदेंच्या सनद रद्द निर्णयास स्थगिती